Wednesday, December 15, 2010 | By: सुर्यकिरण

यत्नयज्ञ...

बरं होतं.. हो हो बरं होतं,

मी एकटाच होतो..

शब्दांच वारूळ नव्हतं,

भावनांचं वादळ नव्हतं..

होती फक्त ती एकाकी जाणिव..

अन कसलीतरी वेगळीच उणिव..


बरं होतं .. मी एकटाच होतो..

गर्द सावलीसारखं मी सुद्धा,

कडक उन्हात होरपळत होतो..

बेभान अश्या त्या फाजिल पावसात,

मर्यादा उराशी लपेटून स्तब्ध होतो..


बरं होतं .. मी एकटाच होतो..

लाल निखार्‍याला घट्ट बिलगून...

राख व्हायची वाट पाहत बसायचो,

अन कधीकधी शुभ्र कापर्‍या देहाला,

ज्वालेशी संगत करून मुक्त व्हायचो..


बरं होतं मी एकटाच होतो..

चांदण्यारातीचं एकच ते स्वप्न,

अन पहाटेची ती अविट गोडी..

एवढ्याच काय त्या सवयी..

माझ्या झोपेनं पाळल्या होत्या..

अरेच्या !..खरतर अश्या कित्येक राती,

माझ्या बिछाण्यावर येऊन बाटल्या होत्या..


पण आज किनार्‍यावर आलो,

उभा राहीलो, साद घातली,

लाटांची सलगी पाहीली अन

अचानक आलेल्या वादळानं,

माझ्याच जिवनाची किनार,

अक्षरशः विद्रूपताना पाहीली..


खरं सांगायचं तर ..

आज माझ्याच तळपायात,

माझ्याच विषाचा काटा रुतला,

अन एकला जीव सावरण्या,

यत्न यज्ञांचा होम हवनही..

अखेरीस असफल ठरला..

...असफल ठरला..


-- सूर्यकिरण..

उध्वस्त...

दु:ख विसरण्या आता,

तू मला टाळत गेलीस,
विरहाच्या अघोरी सलांना,
उराशी कवटाळत गेलीस..

चांदण्यांच्या गाव वसताना,
तू वेस लांबवत गेलीस...
रंगता डाव पटावरी,
तू पटले उधळत गेलीस...

मैफिलीचे कळता पडघम,
चाळ पायी तुडवत गेलीस,
दोन फुले मुठीत धरूनी,
माळ सारी विस्कटत गेलीस..
अडवण्यास माझ्या तू,
खोटेपणा ठरवून गेलीस,
हट्टी स्वभावास तुझ्या,
तू का आज गिरवून गेलीस?

उध्वस्त आता दुवे अंतरी,
भविष्य माझे लिहून गेलीस,
तळहाती ठेवूनी हात असा,
हस्तरेषा हळूवार खोडून गेलीस...
हस्तरेषा हळूवार खोडून गेलीस...

- सूर्यकिरण..

राख..

तांबडी वलये दवडत,
आज सांजवेळ झाली,
अडवू कसे अश्रूस आता,
शिंपल्यास आता ओल आली..
अंधार दाटला पार आता,
देऊळी दिवेलागण झाली,
वासराले उरात घेऊनी गाय,
गोंजारत गोठ्यात आली..
चांदण्याचा रंगला सोहळा,
अंगणी रातराणी बहरली,
गंध फुलांचा कितीक हळवा,
वेचण्या झूळूक हळूवार आली..
साधता देह थरथर अशी,
उब मजसी परकी जाहली,
कुस बदलता हळूवार सखे,
स्वप्नेही सारी मोडीत निघाली..

पहाटसुखाची आशा वेडी,
तावदानी हसत उभी राहीली..
मात्र हा क्षण साधया सखे,
फक्त ! अन फक्त !
राख माझी मी उधळू पाहीली...

-- सुर्यकिरण...

विलीन...

तू उमलत राहीलास काट्यात,

अन मी दरवळात मोहीत राहीले..
मला विसरून "ती"च्या केसातल्या,
कळीस का मी माझ्या तळहाती पाहीले..

शब्दांचे मुके भाव घेतल्या ओळींनी,
उगाच मी आयुष्य माझे रंगवत राहीले,
तुझ्या हाती शोभला रुमाल "ती" चा,
अन मी मात्र ओल्या आसवांचे थेंब..
माझ्या पदरास कवटाळताना पाहीले..

ओठांच्या पाकळ्यात साचलेल्या शर्करेस,
तुझा स्पर्शविना धजावणारे वेडेसे कंप,
आज "ती"च्या गुलाबी स्मितहास्यात पाहीले..
अन माझ्यात असलेल्या शृंगारतेस आज,
उगाच मी का विटाळताना पाहीले......

तुझा किनारा तुला लाभता..
अतृप्त सागरास फक्त आभार दिले,
पाहता "ती" ला तुझ्या किनारी,
क्षितीजाच्या तांबड्या वलयांमधे..
हळूवार स्वतःला विलीन होताना पाहीले...

-- सूर्यकिरण..

पानगळ..

मिटता डोळे अलगद,

छळती स्वप्ने हजार,

आठवणींच्या गर्दीत मांडला,

अश्रूंचा हा काळाबाजार...



विरहाची लाट अघोरी,

उध्वस्त करी किनार,

एकांताचे हे सल दुखरे,

शोधती शब्दांचे आधार..



भावनांची विस्कटे रांगोळी,

बरसूनी यातना वारंवार,

शोधण्या वाट क्षितिजाची,

आडवा आला हो अंधार..



उरले फक्त श्वास अंतरी,

जाहला देह आत्म्यास भार,

मृत्यूही शीणला असेल आता,

भोगूनी प्रतिक्षेतला हा थरार..



प्राण जाता, उरी आता

समाधीस शोभेल तो पार,

भेटण्यास येशील जेव्हा,

असेल त्यावरी सजलेला,

पर्ण केशरी वर्णाचा हार...



--- सूर्यकिरण..
Saturday, July 3, 2010 | By: सुर्यकिरण

आठवतयं का गं तुला...

तळ्याकाठी बसून,
गालातल्या गालात हसून,
माझ्या प्रतिबिंबाला दिलेली
ती स्मितेची एक साद..

आठवतयं का तूला...

फेसाळलेल्या लाटांनी,
अलगद किनार्‍यानी मिठित घेतलेलं,
ते सारं डोळ्यात साठवता साठवता,
तुझं डोकं माझ्या छातीवर हळूवार टेकलेलं...

आठवतयं का तूला..

फुलांच्या रंगेबिरंगी दुनियेत,
तू नेहमी स्वतःला हरवून जायची,
तुझे तुलाच मग शोधत असताना,
मलाच मनोमन आठवत रहायची..

आठवतयं का तूला..

तुझा तो नाजूक शैलीतला आवाज,
डोळ्यात सजलेला नक्षत्री साज,
माझ्या चोरट्या त्या कटाक्षाने,
तुझ्या माझात आडवी यायची ती "लाज"

आठवतयं का गं तुला...

वाट बघता बघता आसवांचा धीर सुटायचा,
काजळी पापण्यातून प्रवाह गाली उमटायचा,
मी समोर दिसताच माझ्यावर उगाच रुसून,
तो हळूवार कुशीत शांत व्हायचा..

आठवतयं का गं तूला..

पण तो कालचा पाऊस मुक्यानेच रडलेला,
तुझ्या गैरहजेरीत मी नखशिखांत भिजलेला,
कसे सांगू प्रिये तुला आता,
तु नव्हतीस या सत्याने तो पाऊसही,
माझ्याशी वैर धरून वागलेला..

आठवतयं का गं तुला,

सांग ना एकदा मला,
तुझ्यावाचून तडफडतोय जीव माझा,
अन गर्दितही झालोय मी एकला..

००० सुर्यकिरण ०००

कळपातला पहिला पाऊस...

कळपातला पहिला पाऊस... 

गीत गावे पुन्हा,
ह्या ओल्या पावसाचे,
कसे सांडते पाणी आभाळी,
गोर गरिबाच्या नवसाचे..

भेगाळली भुई आता,
सुखावेल थोडी,
इवलूष्या गवताला,
मिळेल थेंबाची हो गोडी..

वाराही गायील गाणे,
ओला सुंगध लेवून..
काळ्या मेघांचे हो संगीत
जाईल नगरी दुमदुमून..

नाचू लागतील आता,
उघडी नागडी लेकरे,
ओल्या थेंबांचे मोती,
झटकतील हो मेंढरे..

सावर गं ओलं पातळं,
अंगी अलवार झटलेलं,
जणू तान्ह गं पोरं,
थंडीने गारठलेलं...

असं रे कसं तुझं येणं,
क्षणात सारं सुखावूनं
नाचतो बघ आनंद कसा,
एका एका थेंबातून...

-- सुर्यकिरण..

सुर्याचा आला फोन...

आज भल्या पहाटेच फोन वाजला,
receive करताच माझा कान भाजला..
घाबरूनचं विचारलं कोण बोलतयं,
सकाळ सकाळ तुम्हाला काय हवयं ..

तिकडून उत्तर आलं..
मी अकाशातून सुर्य बोलतोय,
मी हसून म्हणालो
कशाला उगाच मस्करी करतोय...

काय काम आहे?
मी सहजच विचारलं..
VRS घेतोय त्यानं
बिन्धास्त सांगितलं..

माझी तर झोपच उडाली,
कारण सागर, झाडे , वेली,
प्राणि पक्षी सगळ्यांनीच माझी,
कॉल वेटिंगवर माझी गोची केली..

ऐकेकाच्या फोनला उत्तर देता देता,
माझ्या नाकी नऊ आले,
सारेच कशे एकदम
राजीनामा द्यायला निघालेअ ओ, आता काय करायचं

मी सुर्याला callback केला
तर out of reach चा रिप्लाय आला,
खिडकीतून पाहतोय तर,
झाडे वेलींचा तांडा निघालेला..

तेवढ्यात पृथ्वीचा sms आला,
समाधी घेतेयं रे मी आता,
good bye करायचं होतं म्हणून,
तुला disturb केलं रे नाथा..

आता अश्या पहाट स्वप्नांचा अर्थ,
तुम्हीच लावून पहा तुम्हाला हवा तसा,
नाहीतर प्रतिबिंबात एकटक पाहता,
तडकन फुटून जाईल सार्‍यांच्या जिवनाचा आरसा..

-- सुर्यकिरण..

जागतीक पर्यावरण दिना निमित्त -उर्जा संवर्धन - काळाची गरज...

गुरांना चारा ....गाटीला पैका घरच्या घरी सामाजिक वनीकरन येता दारी"
सह्याद्री - दुरदर्शन वरील एक जुनी जाहीरात, आठवतेयं का तुम्हाला कि विसरालात आजच्या M tv , F tv च्या भयान मिडिया जगात. काय होतं ह्या जाहिरातीमधे, का ती तेव्हाचं दाखवली गेली अन आज तीचा काय संदर्भ हा प्रश्न तुमच्या मनाला नक्कीच पडला असेल ना ?

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें

परम पुज्य जगत गुरू तुकाराम महाराजांनी रचलेल्या ह्या ओळी, याचे भान आजच्या पिढीला, समजाला राहीले आहे काय ? अहो राहिले असते तर आज हे असे झाले नसते. उन्हाळ्यात उन्हाच्या कहराने लोक मरतायेतं, पावसाळ्यातल्या पुरात तर सारं नशिबच हात धुवून वाहून जातोय. ऐन हिवाळ्यातही हिमालयातला बर्फ वितळतोय.हे का अन कशासाठी होतयं याचा विचार केलाय का कधी? नाही ना मग आता करा नाहीतर अजून काही वर्षानी मेंदूला संभाळणारा प्राणी मेंदूएवढाच शिल्लक राहील अन अखेरीस लुप्त होईल ही सारी जिवसृष्टी.
भारतातला अणूकरार सगळ्यांचा आठवत असेल कसा विसरणार .. कारण सरकारच्या बुडाखालची भुई गायब होणार होती ना तेव्हा.. एवढीच ओळख शिल्लक असेल त्या अणूकराराच्या तांडवाची. अरे पण तो अणूकरार कशासाठी, कोणासाठी, काय आहे त्यात, काय होईल त्यापासून याचा विचार का कोण करत नाही. मानेवरचं डोकं गुडघ्यात शाबूत ठेवून आपल ढिम्मासारखं बसायचं अन जे सगळ्यांच होईल तेच माझं होईल तेव्हा जगून घ्या ऐशोआरामात ह्या वृत्तीला पोसण्याचे काम सध्या सुरू आहे. तेव्हा कृपा करून आता तरी जागे व्हा अन उर्जा संवर्धनासारखे दुसरे गुप्तधन नाही हे ओळखून घ्या.
तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित पण एका वर्षाला देशात ५ हजार करोड रुपयांच नुकसान विद्युत उर्जा व्यवस्थापन त्रूटी दुरुस्त करण्यात अन तीची होणारी चोरी यातून होते. मग तुम्हीच सांगा जी आहे ती संभाळण्यासाठीच एवढा खर्च म्हणजे आहेच ना नाकापेक्षा मोती जड. मागच्यावर्षी एका संशोधनातून सांगण्यात आलं की जेवढी उर्जा सुर्याकडून मिळते त्या उर्जेचा योग्य उपयोग करून जर वीज उत्पादन केली तर आज जेवढी उर्जा विज आपण खर्च करतो त्यापेक्षा २० हजार पट उर्जा आपण या जगात निर्माण करू शकतो. पण ह्यावर कोणी गांभिर्याने विचार केला तर काही होईल ना ! अन भारतात अश्या अपारंपारीक उर्जेचा फक्त दिड टक्काच उपयोग केला जातो , जर तोच उपयोग ५० % एवढा जरी केला तरी भारताचं उज्वल देशाचं स्वप्न साकार होण्यास जास्त वेळ लागणार नाही. अन भारतात अश्या प्रकारची उर्जा संवर्धन करण्यामधे तमिळनाडूचा दोन तृतिअंश सहभाग आहे कारण फक्त त्याच राज्यामधे अश्या उर्जास्त्रोतांचा उपयोग अन त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तेव्हा इतर राज्यांना काय धाड भरलीये या बद्दल जाणून घेण्यासाठी ?

610x.jpg
आतंराष्ट्रीय जगताची कच्च्या तेलावरची पकड, इधंनासाठी वापण्यात येणारे नैसर्गिक वायुंचे साठे अन त्यांची उपलब्धता, जागतीक बाजारातली कोळश्याची वाढलेली किंमत या सगळ्यावर गांभिर्याने विचार केला तर नक्कीच आपल्याल्या उर्जा संवर्धनाची गरज आहे हे कळून चुकेल. मान्य आहे कि कोळसा, इधंन वापरून निर्माण केलेली वीज, उर्जा ही सौरउर्जा, पवन उर्जेच्या तुलनेने स्वस्त आहे पण थोड्या नुकसानासाठी आपण दुरचा फायदा का विसरतो हे अजूनही मला समजत नाही कारण सौरउर्जा, पवन उर्जेतून मिळणारी उर्जा, वीज ही नक्कीच मोठ्याप्रमाणात अन जास्त काळ टिकवून ठेवता येणारी आहे हे लक्षात यायला हवं.अन त्यासाठी आपल्याकडच्या लोकांच अज्ञान दुर व्हायला हवं. आज अमेरिकासारख्या बलाढ्य देशात सौरउर्जेसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेवून त्याला त्यासाठी योग्य मोबदला ही दिला जातो अन त्या जमिनीमधे तो मक्यासारखं पिक घेवून वार्षिक उत्पन सुमारे ३०००० डॉलर इतके घेवू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की तिथे ह्यासगळ्याचं एक योग्य ज्ञान तिथल्या शेतकर्‍यांना आहे, त्याचे महत्व त्या लोकांना कळालेलं आहे.

energy-main.jpg
चीन हा पारंपारीक उर्जास्तोतापासून उर्जा बनवणाला अव्वल देश ठरला आहे , सौर उर्जा , पवन उर्जा अन विशेष म्हणजे भुगर्भिय उर्जेचा उपयोग करून मोठ्याप्रमाणात वीज बनवली जात आहे. सोबतचं स्पेन सुद्धा यात अग्रेसर आहे. पारंपारिक सौर प्लेट ही सिलिकॉन पासून बनलेली असते, ही जरी महाग असली तरी तिच्यातून निर्माण होणारी उर्जा खरचं खूप लाभदायक आहे. अन तिच्या महागाईमूळे सौर प्लेटला पर्याय शोधण्याचे काम सुरूचं आहे.हि सौरप्लेट सुर्यकिरणांना थेट उर्जेमधे बदलून आपल्याला वीज मिळते.अन काही राष्ट्रामंधे तर या सौरकिरणांचा उपयोग करून पाण्याला उकळवलं जातं अन त्या पाण्याची गती वाढवून मोठे मोठे टर्बाईन्स फिरवले जातात अन उर्जा निर्माण केली जात आहे.अश्याप्रकारे उर्जा संवर्धन करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वाळवंटांचा, माळरानांचा सहज उपयोग केला जाऊ शकतो अन ही वीज दुर पर्यंत घेवून जाऊ शकतो.

bio fuel.jpg
नुकतीच वर्तमानपत्रात आपण वाचलं के "रेवा कंपनी आता मंहिद्रा सारख्या बड्या वाहन क्षेत्र अग्रेसर कंपनीत विलिनीकरण" काय आहे रेवा कंपनी. रेवा कंपनीने बॅटरीवर चालणारे इंजिन ही कल्पना विकसीत केली अन ती वाहनक्षेत्रात खूप फायद्याची ठरली म्हणूनच आता वाहनक्षेत्रात बहुतांश कंपन्या ह्या अश्याच बॅटरीवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात जनरल मोटर्स, ह्युंडाई या कंपन्यांबद्दल आपल्याला ठाऊक असेलच. या बॅटरीचलित वाहनांमधे प्रदूषण कमी, इंधनखर्च कमी, अन वाहनांच आयुष्य या सगळ्याच गोष्टिंचा फायदा होत आहे तेव्हा हा एक उत्तम पर्याय उर्जा संवर्धनाचा. आणि सगळ्यात अनोखा अन विश्वास न बसणारा एक प्रयोग नुकतचं त्याबद्दल ऐकण्यात येत आहे तो म्हणजे उरलेलं अन्न, खाद्यपदार्थ जे आपण कचर्‍यात टाकून देतो त्यापासून हायड्रोजन निर्माण होतं अन हायड्रोजन हे पेट्रोलपेक्षा तीन पट जास्त उर्जादायी आहे म्हणजे आहे ना पुन्हा लखलाभ. पण हि प्रकिया विकसीत होण्यास आणखी काही वेळ जाईल. आणि हो या पासून मिथेन वायू सुद्धा उत्सर्जित होतो जो एक ग्रिनहाऊस वायू आहे ज्याची क्षमता कार्बनडायॉक्साईड पेक्षा २५ पटीने धोकादायक आहे. तेव्हा ह्या उपक्रमाचा निश्चितच उर्जानिर्मिती अन ग्रिनहाऊस प्रदूषण रोखण्यात दुहेरी फायदा होईल.
एवढं सगळं घडतयं या जगात तरी आपण कुंभकर्णासारखे निपचीत पडून आहोत. तेव्हा आपल्याच हातानी आपणंच एक कानफाटात मारून स्वतःला जागं करण्याची गरज आहे. जर तुम्हाला खरचं या उर्जासंवर्धनाबद्दल कुतूहल वाटतयं तर याबद्दल योग्य मार्गदर्शन घ्या, जाणून घ्या अन तुम्ही सुद्धा हातभार लावा उर्जा वाचवण्यास अन अपारंपारिक उर्जा स्त्रोतापासून उर्जा बनवण्यास. कारण उर्जा ही खरोखर काळाची गरज आहे अन ती वेळेवर पुर्ण नाही झाली तर एवढंच म्हणावं लागेल काळ आला तेव्हा वेळही हाती शिल्लक राहीली नाही.
जगबुडीचं भाकित खरचं जर खोटं ठरवायचं असेल तर उर्जा संवर्धन, वैश्विक तापमान , अन प्रदूषण या गोष्टीवर आवर्जून लक्ष द्या.

go-green.jpg
"Energy conservation is the foundation of energy independence. - Tom Allen "
- सुर्यकिरण.