गुरांना चारा ....गाटीला पैका घरच्या घरी सामाजिक वनीकरन येता दारी" सह्याद्री - दुरदर्शन वरील एक जुनी जाहीरात, आठवतेयं का तुम्हाला कि विसरालात आजच्या M tv , F tv च्या भयान मिडिया जगात. काय होतं ह्या जाहिरातीमधे, का ती तेव्हाचं दाखवली गेली अन आज तीचा काय संदर्भ हा प्रश्न तुमच्या मनाला नक्कीच पडला असेल ना ?
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें
परम पुज्य जगत गुरू तुकाराम महाराजांनी रचलेल्या ह्या ओळी, याचे भान आजच्या पिढीला, समजाला राहीले आहे काय ? अहो राहिले असते तर आज हे असे झाले नसते. उन्हाळ्यात उन्हाच्या कहराने लोक मरतायेतं, पावसाळ्यातल्या पुरात तर सारं नशिबच हात धुवून वाहून जातोय. ऐन हिवाळ्यातही हिमालयातला बर्फ वितळतोय.हे का अन कशासाठी होतयं याचा विचार केलाय का कधी? नाही ना मग आता करा नाहीतर अजून काही वर्षानी मेंदूला संभाळणारा प्राणी मेंदूएवढाच शिल्लक राहील अन अखेरीस लुप्त होईल ही सारी जिवसृष्टी.
भारतातला अणूकरार सगळ्यांचा आठवत असेल कसा विसरणार .. कारण सरकारच्या बुडाखालची भुई गायब होणार होती ना तेव्हा.. एवढीच ओळख शिल्लक असेल त्या अणूकराराच्या तांडवाची. अरे पण तो अणूकरार कशासाठी, कोणासाठी, काय आहे त्यात, काय होईल त्यापासून याचा विचार का कोण करत नाही. मानेवरचं डोकं गुडघ्यात शाबूत ठेवून आपल ढिम्मासारखं बसायचं अन जे सगळ्यांच होईल तेच माझं होईल तेव्हा जगून घ्या ऐशोआरामात ह्या वृत्तीला पोसण्याचे काम सध्या सुरू आहे. तेव्हा कृपा करून आता तरी जागे व्हा अन उर्जा संवर्धनासारखे दुसरे गुप्तधन नाही हे ओळखून घ्या.
तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित पण एका वर्षाला देशात ५ हजार करोड रुपयांच नुकसान विद्युत उर्जा व्यवस्थापन त्रूटी दुरुस्त करण्यात अन तीची होणारी चोरी यातून होते. मग तुम्हीच सांगा जी आहे ती संभाळण्यासाठीच एवढा खर्च म्हणजे आहेच ना नाकापेक्षा मोती जड. मागच्यावर्षी एका संशोधनातून सांगण्यात आलं की जेवढी उर्जा सुर्याकडून मिळते त्या उर्जेचा योग्य उपयोग करून जर वीज उत्पादन केली तर आज जेवढी उर्जा विज आपण खर्च करतो त्यापेक्षा २० हजार पट उर्जा आपण या जगात निर्माण करू शकतो. पण ह्यावर कोणी गांभिर्याने विचार केला तर काही होईल ना ! अन भारतात अश्या अपारंपारीक उर्जेचा फक्त दिड टक्काच उपयोग केला जातो , जर तोच उपयोग ५० % एवढा जरी केला तरी भारताचं उज्वल देशाचं स्वप्न साकार होण्यास जास्त वेळ लागणार नाही. अन भारतात अश्या प्रकारची उर्जा संवर्धन करण्यामधे तमिळनाडूचा दोन तृतिअंश सहभाग आहे कारण फक्त त्याच राज्यामधे अश्या उर्जास्त्रोतांचा उपयोग अन त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तेव्हा इतर राज्यांना काय धाड भरलीये या बद्दल जाणून घेण्यासाठी ?

आतंराष्ट्रीय जगताची कच्च्या तेलावरची पकड, इधंनासाठी वापण्यात येणारे नैसर्गिक वायुंचे साठे अन त्यांची उपलब्धता, जागतीक बाजारातली कोळश्याची वाढलेली किंमत या सगळ्यावर गांभिर्याने विचार केला तर नक्कीच आपल्याल्या उर्जा संवर्धनाची गरज आहे हे कळून चुकेल. मान्य आहे कि कोळसा, इधंन वापरून निर्माण केलेली वीज, उर्जा ही सौरउर्जा, पवन उर्जेच्या तुलनेने स्वस्त आहे पण थोड्या नुकसानासाठी आपण दुरचा फायदा का विसरतो हे अजूनही मला समजत नाही कारण सौरउर्जा, पवन उर्जेतून मिळणारी उर्जा, वीज ही नक्कीच मोठ्याप्रमाणात अन जास्त काळ टिकवून ठेवता येणारी आहे हे लक्षात यायला हवं.अन त्यासाठी आपल्याकडच्या लोकांच अज्ञान दुर व्हायला हवं. आज अमेरिकासारख्या बलाढ्य देशात सौरउर्जेसाठी शेतकर्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेवून त्याला त्यासाठी योग्य मोबदला ही दिला जातो अन त्या जमिनीमधे तो मक्यासारखं पिक घेवून वार्षिक उत्पन सुमारे ३०००० डॉलर इतके घेवू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की तिथे ह्यासगळ्याचं एक योग्य ज्ञान तिथल्या शेतकर्यांना आहे, त्याचे महत्व त्या लोकांना कळालेलं आहे.

चीन हा पारंपारीक उर्जास्तोतापासून उर्जा बनवणाला अव्वल देश ठरला आहे , सौर उर्जा , पवन उर्जा अन विशेष म्हणजे भुगर्भिय उर्जेचा उपयोग करून मोठ्याप्रमाणात वीज बनवली जात आहे. सोबतचं स्पेन सुद्धा यात अग्रेसर आहे. पारंपारिक सौर प्लेट ही सिलिकॉन पासून बनलेली असते, ही जरी महाग असली तरी तिच्यातून निर्माण होणारी उर्जा खरचं खूप लाभदायक आहे. अन तिच्या महागाईमूळे सौर प्लेटला पर्याय शोधण्याचे काम सुरूचं आहे.हि सौरप्लेट सुर्यकिरणांना थेट उर्जेमधे बदलून आपल्याला वीज मिळते.अन काही राष्ट्रामंधे तर या सौरकिरणांचा उपयोग करून पाण्याला उकळवलं जातं अन त्या पाण्याची गती वाढवून मोठे मोठे टर्बाईन्स फिरवले जातात अन उर्जा निर्माण केली जात आहे.अश्याप्रकारे उर्जा संवर्धन करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वाळवंटांचा, माळरानांचा सहज उपयोग केला जाऊ शकतो अन ही वीज दुर पर्यंत घेवून जाऊ शकतो.

नुकतीच वर्तमानपत्रात आपण वाचलं के "रेवा कंपनी आता मंहिद्रा सारख्या बड्या वाहन क्षेत्र अग्रेसर कंपनीत विलिनीकरण" काय आहे रेवा कंपनी. रेवा कंपनीने बॅटरीवर चालणारे इंजिन ही कल्पना विकसीत केली अन ती वाहनक्षेत्रात खूप फायद्याची ठरली म्हणूनच आता वाहनक्षेत्रात बहुतांश कंपन्या ह्या अश्याच बॅटरीवर चालणार्या वाहनांची निर्मिती करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात जनरल मोटर्स, ह्युंडाई या कंपन्यांबद्दल आपल्याला ठाऊक असेलच. या बॅटरीचलित वाहनांमधे प्रदूषण कमी, इंधनखर्च कमी, अन वाहनांच आयुष्य या सगळ्याच गोष्टिंचा फायदा होत आहे तेव्हा हा एक उत्तम पर्याय उर्जा संवर्धनाचा. आणि सगळ्यात अनोखा अन विश्वास न बसणारा एक प्रयोग नुकतचं त्याबद्दल ऐकण्यात येत आहे तो म्हणजे उरलेलं अन्न, खाद्यपदार्थ जे आपण कचर्यात टाकून देतो त्यापासून हायड्रोजन निर्माण होतं अन हायड्रोजन हे पेट्रोलपेक्षा तीन पट जास्त उर्जादायी आहे म्हणजे आहे ना पुन्हा लखलाभ. पण हि प्रकिया विकसीत होण्यास आणखी काही वेळ जाईल. आणि हो या पासून मिथेन वायू सुद्धा उत्सर्जित होतो जो एक ग्रिनहाऊस वायू आहे ज्याची क्षमता कार्बनडायॉक्साईड पेक्षा २५ पटीने धोकादायक आहे. तेव्हा ह्या उपक्रमाचा निश्चितच उर्जानिर्मिती अन ग्रिनहाऊस प्रदूषण रोखण्यात दुहेरी फायदा होईल.
एवढं सगळं घडतयं या जगात तरी आपण कुंभकर्णासारखे निपचीत पडून आहोत. तेव्हा आपल्याच हातानी आपणंच एक कानफाटात मारून स्वतःला जागं करण्याची गरज आहे. जर तुम्हाला खरचं या उर्जासंवर्धनाबद्दल कुतूहल वाटतयं तर याबद्दल योग्य मार्गदर्शन घ्या, जाणून घ्या अन तुम्ही सुद्धा हातभार लावा उर्जा वाचवण्यास अन अपारंपारिक उर्जा स्त्रोतापासून उर्जा बनवण्यास. कारण उर्जा ही खरोखर काळाची गरज आहे अन ती वेळेवर पुर्ण नाही झाली तर एवढंच म्हणावं लागेल काळ आला तेव्हा वेळही हाती शिल्लक राहीली नाही.
जगबुडीचं भाकित खरचं जर खोटं ठरवायचं असेल तर उर्जा संवर्धन, वैश्विक तापमान , अन प्रदूषण या गोष्टीवर आवर्जून लक्ष द्या.
"Energy conservation is the foundation of energy independence. - Tom Allen "
- सुर्यकिरण.