Saturday, July 3, 2010 | By: सुर्यकिरण

पुन्हा पुन्हा तेच तेच...

पुन्हा एक पहाट
काळ्या रातीच्या स्वप्नाना,
सुर्य तळपत्या उन्हात कष्टकर्माला,
जोडणारी...

पुन्हा एक दुपार,
ओघळणार्‍या घामधारा,
वाढलेला भुकेचा पारा,
यांच्या दुवा साधणारी...

पुन्हा एक संध्याकाळ,
कातरवेळी लाल मळवट
आठवंणीचे एक वाळवंट,
यांच्यात अश्रू ढाळणारी...

अन पुन्हा एक रात्र..
आला दिवस कसा गेला,
याची उजळणी करता करता,
अंगाई गाणारी...

पुन्हा पुन्हा तेच सारे,
नाही कुठले नवे किनारे,
आता पुन्हा उध्वस्त
जगण्यास शिस्त लागेल का रे... ?

-- सुर्यकिरण

1 प्रतिसाद..:

विशाल विजय कुलकर्णी said...

राजा, अरे जगण्याला जर शिस्त लागली तर सगळे जगणेच बेसुरे होणार नाही का? रच्याकने या कविता माबोवर पाहिल्या नाहीत कधी?

Post a Comment