Wednesday, December 15, 2010 | By: सुर्यकिरण

राख..

तांबडी वलये दवडत,
आज सांजवेळ झाली,
अडवू कसे अश्रूस आता,
शिंपल्यास आता ओल आली..
अंधार दाटला पार आता,
देऊळी दिवेलागण झाली,
वासराले उरात घेऊनी गाय,
गोंजारत गोठ्यात आली..
चांदण्याचा रंगला सोहळा,
अंगणी रातराणी बहरली,
गंध फुलांचा कितीक हळवा,
वेचण्या झूळूक हळूवार आली..
साधता देह थरथर अशी,
उब मजसी परकी जाहली,
कुस बदलता हळूवार सखे,
स्वप्नेही सारी मोडीत निघाली..

पहाटसुखाची आशा वेडी,
तावदानी हसत उभी राहीली..
मात्र हा क्षण साधया सखे,
फक्त ! अन फक्त !
राख माझी मी उधळू पाहीली...

-- सुर्यकिरण...

0 प्रतिसाद..:

Post a Comment