बरं होतं.. हो हो बरं होतं,
मी एकटाच होतो..
शब्दांच वारूळ नव्हतं,
भावनांचं वादळ नव्हतं..
होती फक्त ती एकाकी जाणिव..
अन कसलीतरी वेगळीच उणिव..
बरं होतं .. मी एकटाच होतो..
गर्द सावलीसारखं मी सुद्धा,
कडक उन्हात होरपळत होतो..
बेभान अश्या त्या फाजिल पावसात,
मर्यादा उराशी लपेटून स्तब्ध होतो..
बरं होतं .. मी एकटाच होतो..
लाल निखार्याला घट्ट बिलगून...
राख व्हायची वाट पाहत बसायचो,
अन कधीकधी शुभ्र कापर्या देहाला,
ज्वालेशी संगत करून मुक्त व्हायचो..
बरं होतं मी एकटाच होतो..
चांदण्यारातीचं एकच ते स्वप्न,
अन पहाटेची ती अविट गोडी..
एवढ्याच काय त्या सवयी..
माझ्या झोपेनं पाळल्या होत्या..
अरेच्या !..खरतर अश्या कित्येक राती,
माझ्या बिछाण्यावर येऊन बाटल्या होत्या..
पण आज किनार्यावर आलो,
उभा राहीलो, साद घातली,
लाटांची सलगी पाहीली अन
अचानक आलेल्या वादळानं,
माझ्याच जिवनाची किनार,
अक्षरशः विद्रूपताना पाहीली..
खरं सांगायचं तर ..
आज माझ्याच तळपायात,
माझ्याच विषाचा काटा रुतला,
अन एकला जीव सावरण्या,
यत्न यज्ञांचा होम हवनही..
अखेरीस असफल ठरला..
...असफल ठरला..
-- सूर्यकिरण..
0 प्रतिसाद..:
Post a Comment