Sunday, June 27, 2010 | By: सुर्यकिरण

क्षणमिलन..

पिक्चर फ्रेम करून माझ्या टेबलावर ठेवलेली ही एक कविता... स्मित
क्षणमिलन..
 
तोडून सारी बंधने,
पुन्हा एकदा भेटलो,
तळ्यातल्यां चांदण्या पाहत,
एका आडोश्याला लपलो..

ती भेट मिलनाची,
अवचित होती घडलेली,
पावले वेगात येताना,
घुंगरे पैंजणाची निसटलेली..

पदर तुझा किनारी,
होता वार्‍याने खेचलेला,
स्पर्श तुझ्या थरथर ओठांचा,
मी हळूवार ओठांनी वेचलेला..

रोमांच बेभान होऊनी
या देही संचारलेला,
स्पर्शवेलींच्या झुल्यात,
झोका उंच आकाशी भिडलेला,

गंध शुभ्र रातराणीचा,
तुझ्या केसात पसरलेला,
रंग गुलाबी तुझ्या गाली,
सखे धुंद बेधुंद झालेला

खरतंर तुझ्यामाझ्या मिठित तेव्हा,
संवादही अगदी अबोल झालेला,
नजरेच्या खाणाखुणांनी अखेर,
मिलनक्षण तो लाजूनी हसलेला... 

-- सुर्यकिरण

एक आठवण -- वेगळीच जराशी...


खूप कंटाळा आलाय,
रोजच्या अश्या जगण्याचा,
नाही उरला छंद कुठला,
आला ऋतू आंनदाने मोहरण्याचा


चल ना रे जाऊया आपण
कुठेतरी दुर दुर निंवात
जिथे असेल एखादी संध्या
अन सुखे सारी अनंत


नको गं, आज नको
मला नाही गं जमायचं,
माझ्या रोजनिशीतलं एखादं
पानं उगाच नाही का वाया जायचं...



तू असा रे कसा वागतोस,
मला मुळीच कळत नाही
विरहात जीव घेतोस माझा,
अन म्हणतो मी अजिबात छळत नाही...


जाऊदेत सोड, मी जाते त्याच्याबरोबर
तुला कायमच कायमच सोडून
मग बसशील रडतं कुढत
मला क्षणा क्षणाला आठवून.


अगं थांब, चाललीयेसचं ना
मग मी सांगतो तिथेच जा
माझ्या स्वप्नातलं ठिकाण
त्याच्या सोबत अवश्य पहा..


उंच असेल एक टेकडी
वाट घाटाची तिला वाकडी
उंच पठारी असेल बसायला,
तीच लाकडाची एक बाकडी..


बसशील तिथे तू जेव्हा,
तो तुझ्या खूप नजिक असेल,
अन समोरून तुला वाहनांची
एका ओळीतली सुरेख आरास दिसेल..


हवाही खेळती असेल,
तुमच्या दोघात,
अन मग आनंद संचारेल,
तुमच्या देहात...


एकत्र येतील कदाचित ती नाती,
विण तुटण्याच्या वाटेवर भरकटलेली,
तुझ्या सहवासासाठी कदाचित त्याचीही
श्वासश्रूंखला अडखळलेली...


मग आवडत्या ठिकाणी जाऊन आल्यावर... तीच्या मनातून काहीतरी...

किती रे प्रेम करतोस माझ्यावर,
मला अजूनही उमगलेच नाही,
तुझ्यासारखं सारं गमवूनही,
हसायला मात्र जमलेच नाही... 


खूप सुंदर होती रे ती संध्याकाळ,
माझ्या आयुष्यात कधी न आलेली,
त्याची अर्धांगिणी असूनही,
आसवांची गर्दी तुझ्यासाठी जमवलेली...


आजही तुझी आठवण येते,
पण तू कुठेच दिसत नाही,
मात्र त्या भेटीच्या क्षणाला आठवून,
हुंदका काढून रडण्यास मी विसरत नाही...


--सुर्यकिरण...

काल आणि आज....

काल तुला मी चिंब ओल्या
सरीत भिजताना पाहीलं,
आज मात्र त्या सरींना
डोळ्यातून ओघळताना पाहीलं...

काल तूला मी गंध फुलांच्या,
गर्दित सुगंधताना पाहिलं,
आज मात्र त्या गर्दिला,
अक्षरशः कोमेजताना पाहिलं...

काल तूला मी चांदण्याच्या
सड्यात लख्ख चमकताना पाहिलं,
आज मात्र त्या सड्यावर,
अमावस्येच्या काळ्या बुरख्याला पाहिलं...

काल तूला मी आरश्यासमोर,
प्रतिबिंबाला स्मित करताना पाहिलं,
आज मात्र प्रतिबिंबाच्या त्या छबीने,
दर्पणालाच नकारलेलं पाहीलं...

सवय झाली होती तुझी मला,
म्हणून याचं कारण विचारून पाहीलं,
कारणाचं उत्तर ऐकताना अगदी,
तुझ्यासारखंच बदलताना मी स्वतःला पाहिलं...

-- सुर्यकिरण...

"गुड बाय टू ऑल ह्युमन बिईंग" ...

"गुड बाय टू ऑल ह्युमन बिईंग" ...

काय दचकलात ना, हे असं कायं शिर्षक दिलंय म्हणून ! हो असचं काहीसं आहे हे मी माझ्याबद्दल नाही लिहीलयं. हे तुमच्या आमच्यातल्या हिडन पण अविभाज्य अश्या घटकाबद्दल लिहीलय अन तो घटक म्हणजे "मन". हो हो तुमचं आमचं मन.
अशक्य आहे पण कधी मनाने ठरवलं की सगळ्या मानवी जातीला गुडबाय करून निघून जायचं तर काय होईल? याचा विचार करा जरा. कारण आपला आपल्या मनावर किती ताबा आहे हे जरा स्वतःला विचारून पहा. क्षणिक सुखासाठी आपण मनाचे काय हाल करतो, कित्येकदा मनाला न पटणार्‍या पण आपल्या फायद्याच्या गोष्टी आपण कळत नकळत कश्या घडवून आणतो. खरतरं या मनाला आपल्या आयुष्यात काही तरी स्थान आहे ते आबादित राहीलंय का सांगा पाहू. कित्येकदा आपण बोलतो की मनात ठरवलं की आपोआप सगळ्या गोष्टी घडून येतात. पण तितक्या तन्मयतेने आपण आपल्या मनाला वाव देतो का? ठाऊक आहे वय जसं वाढत जातं तशी शरीराची जडणघडण होते अन परीणामी मनाचीही होते. पण जडणघडण करून घेणे यात काहीचं वावगं नाही कारण या पृथ्वीतलावरची प्रत्येक जिवसॄषटी आपल्यात बदल करू पाहतेच की. पण आजकाल माणसातले बदल हे मनाविरुद्धच होत चालले आहेत असं नाही का वाटत तुम्हाला.
मुल जन्माला येतं तेव्हा त्याला मन म्हणजे काय हे ठाऊक नसतं ते जस जसं मोठं होत जात तस तश्या त्याचा जिवनाचा प्रवास सुरु होतो.आईला आई म्हणायचं अन ते ही न विसरता आपल्याच आईला आई म्हणायचं हे त्याला कसं बरं कळत असेल. कारण त्याच्या मनात त्या गोष्टी सहज अगदी लाटेवर शिडाची बोट डोलत रहावी ना तसं डोलत असतं अन ते जिवनाचा किनारा येईपर्यंत तसचं राहतं. असचं असतं मन.. पुढे शाळेत जातात मुले तेव्हा त्याना फुले, फुलपाखरं , गोड धोड असं काही आवडायला लागतं ही सुद्धा मनानेच ठरवलेली आवड असते ना? मग आज ती आवड आपण त्यांना ठरवू देतो का. एकदा विचारून पहा स्वतःच्याच मनाला. आजकाल लहान मुलांनासुद्धा संस्कारवर्गाच्या शिकवण्या लावाव्या लागतात कारण मोठ्यांच्या संस्कार मनावर त्यांचा विश्वास राहीलेला नाही का त्यांनी मोठ्यांच्या काळात सुद्धा त्यांनी सुद्धा संस्कारवर्गच लावले होते का. वाल्मिकी ऋषीनी रामायण लिहलं ते त्यांच्या मनात पुढच्या पिढिवर संस्कार व्हावे याच उद्देशाने ना. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना मांडली अन ती पुर्णत्वाला नेली ती सुद्धा याच मनाच्या हाकेतून ना ? मग आज तुमच्या मुलाला का तुम्ही शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक , राजगूरू नाही बनवत ? इंजिनिअर, डॉक्टर , वकिल हेच त्यांनी व्हावं अशी अपेक्षा ठेवून तुम्ही त्यांच्या कोवळ्या मनावर तुमचे हट्ट लादता, ज्यांचे हट्ट करायचे मन त्यांच्यावरचं तुमच्या मोठ्यांचे हट्ट किती विशिप्त वागतो ना आपण याचा विचार केलाय कधी. आहो फुलाला फुलायचंय , सुंगध पसरवायचाय यासाठी तुमच्या सक्तिचा विचार करतं का त्या फुलाचं नाजूक मनं ? नाही ना मग तुम्ही सुद्धा तुमच्या फुलाला-मुलाला फुलू द्या ना जसं फुलायचयं तसं सुगधू द्या ना त्याला त्याच्या सीमेत. तुम्ही फक्त त्याचं मन भरकट्णार नाही यावर लक्ष द्या. अवघड वाटतं का तुम्हाला... ?
तरूणवयातली मने फार डेलिकेट अन सेन्सेटिव्ह असतात असं खूप जण म्हणतात. कारण मुले वाया जाण्याचा तो एकच काळ आपल्या देशात मानला जातो. पण मने वाईट नसतात कधी कधी परिस्थितीने, आपल्या लादलेल्या निर्बंधाने ती मने भरकटतात. तुम्ही दिशा घालून दिल्या की ती मने अपोआप त्या दिशेने आपली वाट ठरवतात अन योग्य ती सीमा राखूनचं. काल वर्तमान पत्रात वाचलं ऑस्ट्रेलियातली १६ वर्षाची वॅट्सन नावाची मुलगी स्वतःच्या जहाजातून सागरी जगप्रवास केला तेव्हा तो प्रवास सुरू करण्यापुर्वी काय आलं असेल तिच्या मनात, तो प्रवास करताना काय अनुभवलं असेल तिच्या मनाने , अन तो प्रवास पुर्ण झाल्यावर कसा व्यक्त केला असेल आंनद तिच्या मनाने याचा विचार केलाय कुणी, नाहितर फक्त तिच्यावर स्तुतीसुमने उधळून तिच्या मनाच्या या कारकिर्दीला एक इतिहास किंवा जी के च ज्ञान म्हणून बंद केलं ना तुमच्या मनात. अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यांच्या मनाची परिक्षने करण्याची गरज आहे. उदा. कृष्णा पाटील, सचिन तेंडूलकर , लता मंगेशकर.. काय घडलं असेल नेमकं, त्यांच्या मनात?
आणखी लोकांचा एक मोठा गैरसमज तो म्हणजे उतारवयाला लागलं की मन बिन काय नसतं , आता फक्त उरलेली आयुष्याची गणितं सोडवायची ती सुद्धा सुटली तर नाहीतर तोपर्यंत आपल्या श्वासांची शृंखला तूटेलच की. अशक्य आहे हे जोपर्यंत हा देह सजिव आहे तो पर्यंत मनाची सूटका होणे अशक्य ! मनाचं कस आहे माहिती आहे का .. पतंगाला व्यवस्थित कण बांधली की मग ती उंच गेल्यावरही काटल्याशिवाय कटत नाही तसचं आहे मनाचं, त्याला योग्य दिशा हवी , योग्य कमांड हवी मग बघा कसं ते वर आकाशी डोलत राहतं.
तुम्ही विचार करायला सुरवात केली असेल वरचं सगळं वाचून की एवढं सगळं लिहिलयं मग कसाब सारख्या विद्रूपलेल्या व्यक्तीचं काय, अतिरेक्यांना पण असतं ना मन मग त्यांच काय ? आहो त्यांच्या मनानेच त्यांचातून सुटका करून घेतली असेल इतके निर्दयी अन पाषाणदेही आहेत ते. आता तुम्ही म्हणाल देवही पाषाण देही आहे मग तो त्यांच्या सारखा कसा नाहीये. आहे पाषाण देहात जरी असला तरी आपल्या मनात त्याच्याबद्दल असणारी श्रद्धा, आस्था अन विश्वास त्याने मोडलाय का कधी सांगा बरं पण ह्या लोकांनी आपला विश्वासचं काय पण मनं सुद्धा बिथरवली आहेत. हत्या अन आत्महात्या यातला फरकं काय सांगता येईल तुम्हाला ? माझ्यामते मनाच्या विरुद्ध क्रुरतेने केलेलं कर्म म्हणजे हत्या, अन मनाच्या विरुद्ध आपल्याच मनाची केलेली हत्या म्हणजे आत्महत्या होय. आज माझा मलाच कंटाळा आलाय हे ऐकून जर मनाने ठरवलं की हे शरीर आपण सोडायचं, जगात चाललेल्या कळत नकळत राग,लोभ, द्वेष या गोष्टींचा मनाला तिरस्कार वाटू लागला तर मनही वैतागून म्हणेल ना कधीतरी... कंटाळा आलाय मला या सगळ्याचा... अ ओ, आता काय करायचं .. अन तो कंटाळा त्याला खरचं असह्य झाला तर .... असोत मला ह्या लेखाच्या शेवटी एक गाणं आठवलं जे आपण शाळेत असताना प्रार्थना म्हणून गायचो..
इतनी शक्ती हमे देना दात, की मन का विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्ते पे हम से , भूलकर भी कोई भूल ना हो ना...
खरचं क्षणिक सुखासाठी लखलाभ मनाचा बळी देताना आवर्जून विचार करा, कारण अखेर सुख हे मनाच्या सहजतेवर अवलंबून असतं अन ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या मनाला चांगली जमते. मनाला जमवून घेणं पटतं नाही तरी आपण जमवून घेतो, मनाला सामावून घेणं पटतं अन आपण तेच तर करतं नाही. तेव्हा आपल्यातल्या मनाला जपा , त्याला काय हवयं काय नकोयं याचा विचार करा अन खुशाल जिंदगी जगा. कारण त्याने खरचं गुडबाय म्हटलं तर आपल्याला दुखात रडताना खांदा उरणार नाही, माणुसकी , आपूलकी या सारखे शब्द कुठेतरी ऐकले होते असचं म्हणायची वेळ येईल.
रामदास स्वांमीचे श्लोक आठवले.. हा लेख लिहिताना ...
समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक (०१ ते २०)
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।। मुळारंभ आरंभ तो निगुर्णाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ।। १ ।।
मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।।
जनीं निद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य ते सर्वभावें करावें ।। २ ।।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधीं वदावा ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ।। ३ ।।
मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापकामा नको रे ।।
मना सर्वथा नीति सोडूं नको हो । मना अंतरीं सारवीचार राहो ।। ४ ।।
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।।
मना कल्पना ते नको विषयांची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ।। ५ ।।
नको रे मना क्रोध हा खेरकारी । नको रे मना काम नानाविकारी ।।
नको रे मना लोभ हा अंगिकारूं । नको रे मना मत्सरू दंभभारू ।। ६ ।।
मना श्रेष्ठ धारिष्ट जींवी धरावें । मना बोलणें नीच सोशीत जावें ।।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ।। ७ ।।
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ।।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नाववावें ।। ८ ।।
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अति स्वार्थबुध्दी न रे पाप सांचे ।।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासारिखें दु:ख मोठे ।। ९ ।।
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी ।।
देहेदु:ख तें सूख मानीत जावें । विवेकं सदा स्वस्वरूपी भरावें ।। १० ।।
जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ।।
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें । तयासारिखें भोगाणें प्राप्त झालें ।। ११ ।।
मना मानसीं दु:ख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ।।
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ।। १२ ।।
मना सांग पां रावणा काय झालें । अकस्मात तें राज्य सर्वै बुडालें ।।
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं । बळे लाभला काळ हा पाठिलागीं ।। १३ ।।
जिवा कर्मयोगें जनीं जन्म झाला । परि शेवटी काळमूखीं निमाला ।।
महाथोर ते मृत्युपंथे चि गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ।। १४ ।।
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ।।
चिंरंजीव हें सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ।। १५ ।।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढें जात आहे ।।
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यांतें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ।। १६ ।।
मनीं मानव व्यर्थ चिंता वहावें । अकस्मात होणार होऊनि जातें ।।
घडे भोगणें सर्वही कर्मयोगें । मतीमंद तें खेद मानी वियोगें ।। १७ ।।
मना राघवेंवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तूं रे ।।
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणें ।। १८ ।।
मना सर्वथा सत्य सोडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।।
मना सर्वथा सत्य सोडूं नको रे । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ।। १९ ।।
बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना तोचि मोठी ।।
निरोधें पचे कोंडलें गर्भवासीं । अधोमूखी रे दु:ख त्या बाळकासी ।। २० ।।
-- सुर्यकिरण..
Sunday, May 2, 2010 | By: सुर्यकिरण

माझा गावं माझे शेत...

वर्षभर मेहनत घेवून , माझ्या शेतातले हे सोनं...



चारही बाजूनी वेढलेले छोटेसे डोंगर अन कुशीत असलेलं माझं शेत...



नभाचा निरोप घेत निघालेला सुर्य ...

मागतो काहीतरी...


कोवळ्या फुलासमान,
मजसी जन्म तू दिला,
आयुष्यं म्हणजे काय,
यासी अर्थ तू दिला..

दिली मायेची गं उब,
दिली प्रेमाची गं मिठी,
मज हाक मारताना,
मध पाझरे तुझ्या ओठी

गोंजारत या देहाला
तू मज वाढविले,
अंगार छेलुन सोसुन,
मला फुलासम जपले..

रागावली कधी नाही
नाही केला राग माझा..
तुझ्याचं मांडीवर निजवताना,
सुखावला तुझा तान्हा..

जाता जाता अंत़काळी
तुला एकची गं मागणे
जन्मोजन्मी तुच आई
या बाळाचे सांगणे..

तु असावीस गाय..
जेव्हा पुनर्जन्म घेवून येईन,
घोटळेन गं तुझ्या पायात..
तुझे लडिवाळ वासरु होऊन..


-- सुर्यकिरण..

ऐ बाबा ऐक ना जरा..


नको रे बाबा मला,
तो चांदण्यांचा झुला,
तो निंबोणीच्या झाडामागचा,
चंद्रच आणून दे ना मला..

नको रे हा असला कापूस ओला,
तो काळा काळा ढंग हवाय रे मला,
कारंज्याचा फवारा काय सारखा सारखा,
तो पाऊस ओलाच आवडतोयं ना मला..

नको रे ती इंजिनाची आगगाडी,
हरणाच्याच गाडीत फिरव ना रे मला,
नको थाट झगमग दुनियेचा असला,
वेली-फुलांच्या देशात घेवून चल ना मला..

नको रे मला हे ब्रेड बटर नी जाम,
साखरेचीच पोळी दे ना रे मला,
रोजचं देतो फ्लाईंग किस ,
आज मात्र गालावर साखरपप्पी दे ना मला...

नको रे तो आयपॉड निजताना,
छानंस गाणंच ऐकव ना मला,
रोजचं निजते तुझ्यापासूनी दुर,
आज कुशीत घेवूनी कुरवाळ ना मला...

--- सुर्यकिरण ---
Sunday, April 18, 2010 | By: सुर्यकिरण

नशिबाने आज थट्टा मांडली....


रोजच्या प्रमाणेच , शितल अरूणला उठवायला त्याच्या बेडरूम मधे गेली. अरूण बिचारा मस्त साखरझोपेची स्वप्न पाहण्यात मग्न असावा, तेवढ्यात शितल त्याला ऊठवून म्हणाली आज ऑफिसला जायचं नाहीये का? आता पुरे झाली झोप ऊठा आता. तोंड जरासं वाकडं करून अरूण उठला, अन म्हणाला ऑफिस , बॉसची कटकट रोजचं तेचं काही नविन घडेल का गं आयुष्यात आपल्या? शितल हसली अन म्हणाली आयुष्याचं माहीत नाही पण आज घडेलं. अरूण म्हणाला आज काय आहे असं, शितलं हसली अन उरका लवकर म्हणून लाजून निघून गेली. अरूण आपला, वेड्यासारखं डोकं खाजवतं शितलच्या बोलण्यावर तर्क करू लागलां , काही सुचलं नाही अन लगेच अंघोळीला निघून गेला.

शितल स्वयपाकघरात मस्त अननस शिरा बनवण्यात व्यस्त होती. हसतं होती, गालातल्या खळीत अगही मधाचे टपोरे थेंब झेलतं. अरूण अंघोळीवरून आला अन तिला मिठीत घेवून पुन्हा विचारलं , राणीं सांग ना काय आहे खास आजं? ती म्हणाली संध्याकाळी बाहेर जाऊ फिरायला मगच सांगेन. येताना जमल्यास लवकर या. मला जेवढी लाडि गोडी लावताय ना अता, तेवढीच बॉस ला लावा म्हणजे लवकर सोडीन तो तुम्हाला. अरूण डोळे मिचकवत निघून गेला, अन ऑफिसच ऊरकून जायला निघाला. पण जाता जाता पुन्हा एकदा त्याने डोळ्याच्या इशार्‍याने शितलला विचारलं सांग ना म्हणून , तेवढयात डोळ्यासमोर हजार चांदण्याचा सडा पडल्याचा आनंद घेवून ती थोडा धिर धरा म्हणाली.अन अरूण बाय म्हणून ऑफिसवर गेला. शितल खुश होती. आनंदात होती अरूणच्या डोक्यात मात्र एकच विचार , काय असेल आज. शितलंचा वाढदिवस तर नाहिये ना? आमच्या लग्नाचा वाढदिवस तर नाहिये ना? या सारखे विचार तो करू लागलां. बस स्टॉप वर सुद्धा त्याच्या मनात हेच सारे प्रश्न.

अरूण ऑफिसात पोहचलां खरं पण सारं लक्ष त्याचं घराकडे अन शितलच्या त्या मधाळ स्मिताकडेच होतं. पुन्हा एकदा त्याला करमेनासं झालं अन लगेच शितलंला फोन लावला. कित्येक वेळ रिंग वाजूनही फोन उचलला नाही यावरून अरूण थोडासा चिडलाही. पण पुन्हा विचारलं काय आहे राणी, सांग ना माझं अजिबात कामात लक्ष लागतं नाहींये. शितल पुन्हा हसली, अन म्हणाली मन लावून काम करा, संध्याकाळी नक्की सांगेन. अरूण बिचारा , फोन ठेवून कामात लक्ष देऊ लागलां, पण शितलचा आनंद आठवून तो मनास तिच्याशिवाय कुठेच एकाग्र करू शकत नव्ह्ता. डबा खायलाही त्याला मन लागत नव्हतं पण शितलंला हे कुठून जाणवलं कुणास ठाऊक तिने फोन लावला अरूणला अन म्हणाली शिरा खुप छान झालाय, माझ्यासाठी खाऊन घ्या, खुप आवडेल तुम्हाला. मीच तिथे येऊन भरवतेय तुम्हाला असं इमॅजिन करा अन खाऊन घ्या बघू.
संध्याकाळचे चार वाजत आले, अरूण इतर वेळी बॉस कॅबिन मधे जायला घाबरायचा पण आज तो थेट गेला, अन म्हणाला आज मला ऑफिसातून लवकर जायचयं. बॉस ही काहिचं न विचारता जा म्हणाला याचं अरूणला खुपचं आश्चर्य वाटलं त्याचा विश्वासच बसेना. "खुशियों कि हो रही हैं बारीश्,तो भगवान भी साथ मे भिग रहा हैं" असचं त्याच्या मनात आलं अन तो बॅग उरकून घरी जायला निघाला. बसस्टॉपचं अंतर इतकं दुर नव्हत तरीही मैलो नं मैल चालल्यासारखं तो धापा टाकत चालत होतां. स्टॉपवर आला बसची चातका सारखी वाट पाहत होता. रोजची ती गुलाबाची फुले विकणारी मधूरा, तिथेच त्याच्या जवळ उभी राहून हसत होती, अन एक तरी फुल घ्या म्हणून आग्रह करत होती. रोजचा कंजूसपणा करणार अरूण आज फुलांचा बुके घेतोय, हे पाहून तीने एक फुल एक्स्ट्रा दिलं त्याला अन म्हणाली माझ्याकडून दया तुमच्या बायकोला. अरूण हसला अन नक्की देतो म्हणाला.

बस येत होत्या पण थांबत नव्हत्या, अरूण चिडत होता , मनातल्या मनात शिव्या देत होता. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या पलिकडून एक बाई येताना दिसली, तिच्या डोक्यावर भलं मोठं ओझं , पाठिवर बांधलेलं नागडं लहान पोर, अन बोटाला धरलेली झिंज्या सावरत पुढे पुढे आईला खेचणारी पोरं दिसली. त्याला ते पाहून गरिबी काय असते याचं दर्शन घडतं होतं. त्या बिचार्‍या बाईला हा आयुष्याच्या ओझ्याचा बोजा घेवून बस रस्तादुभाजकावर असलेल्या झाडाखालचा अडोसा हवा होता. अरूणला ते पहावलं नाही थोडया वेळासाठी आपलं वैयक्तिक आनंद विसरुन तो त्या बाईच्या मदतीसाठी धावला. अन तिच्या जवळ जाऊन मदत करू का म्हणून विचारलं तेव्हा त्या बाईच्या डोळ्यातून टचकन पाणी आले अन हो म्हणाली, अरूणने तीच्या डोक्यावरचं ओझ घेतलं अन त्या पोरीला बोटाला धरून चल म्हणाला. रस्ता क्रॉस झाला, त्याने ओझ त्या झाडाखाली ठेवलं अन पोरीला तिथे बसवून, तिच्या हातात एक गुलाबाच फुल दिलं तो पर्यंत त्या पाठीवरच्या पोरालां उराशी कवटाळून ती झाडाखाली येवून बसली. अन म्हणाली दादा, खुप उपकार झाले तुमचे. अरूण सुद्धा गहिवरून आला ते ऐकून. तेवढ्यात त्याची बस समोर स्टॉपवर थांबतेय हे पाहून शितल अन लवकर घरी जायची आठवण त्याला झाली. तो बस च्या दिशेने धावला, बस जवळ गेला .. बस निघत होती अन तो बस मधे चढायची घाई करत होता, मधुरा अन इतर लोक अहो थांबा पडाल खाली म्हणून ओरडत होती पण अरूण त्याच्या धुंदित होता. अन फक्त तिन बोटांच्या आधारावर तो बसच्या दरवाज्याला लटकला, सिग्नल बर बस येताच ड्राइव्हर ने महाभारतात रथाचा आसूड खेचावा तसा ब्रेक दाबला अन अरूणचा तोल गेला अन तो खाली पडला,तो थेड त्याच्या डोक्यावरचं अरूण कसाबसा सावरणार तेवढ्यात वाळून भरलेला ट्रक वाहतूक पोलिसांना चुकवत, तिथून भरदाव वेगाने निघून गेला.

गर्दि जमली, ट्रफिक जाम झाला , पोलिस आले. लोकं तोंडावर हात घेवून बघतच राहीले. काय झालं काही कळेचं ना, त्या तिकडून ती लेकराची माय सुद्धा पाहू लागली. मधूराही गर्दिजवळ धावली अन पाहून सुन्न होऊन बेशूद्धच झाली. क्षणात गर्दिने फुललेला तो चौक ग्रहण लागल्यासारखा शांत झालां. अरूण रक्ताच्या थारोळात , निवांत निजला होता,ती फुले आपल्या छातीला कवटाळून, फुलाची एक पाकळीही चुरली नव्हती पण अरूणचं मस्तक छिन्नविछिन्न झालं होतं. पोलिसांनी गर्दिला पांगवलं अन अ‍ॅंबुलन्स आली, अरूणला दवाखान्यात नेलं, अन कोणीतरी त्याच्या मोबाईल बरून लास्ट डायल कॉल वर फोन लावला,तो थेट शितललाच केला. शितलं काही ऐकून घेण्याआधीच मला ठाऊक होतं आजही तुमच्या बॉसने सोडलं नाही अन तुम्ही लवकर आला नाहीतं पण तो माणूस ओरडला, अन म्हणाला अहो ऐकून तर घ्या तुमच्या नवर्‍याला अपघात झालायं , अमुक हॉस्पिटल मधे लगेच या, शितल हे ऐकून जागेवरच बसली. काही वेळानंतर ती निघाली, हॉस्पिटल मधे पोहचली तेव्हा खुप उशिर झाला होता. तिच्यासाठी कधी नव्हे तो लवकर निघाणारा अरूण कायमचा झोपी गेला होता. हे पाहून शितल , मोठ्या मोठ्याने रडू लागली. तेवढ्यात मधूरा , तिच ती फुलवाली तिच्या जवळ आली अन शितलला कवटाळून म्हणाली, मी पाहिलं त्यांना आज ते तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी जगलेलं. तेव्हा मधुराने सर्व हकिकत सांगितली शितलला. शितलं सारं ऐकून अरूण जवळ गेली अन मिठित घेवून म्हणू लागली, अरे अरूण उठ ना, किती झोपतोयेस, आपल्याला बाहेर जायचयं ना फिरायला ? तु उठ आता डोळे उघडं. थांब तुझ्या कानात सांगितल्यावरच तू डोळे उघडशील. ती त्याच्या कानाजवळ गेली अन म्हणाली अरे अरूण वेड्या तू बाबा होणार आहेस बाबा, एवढं देखील कसं कळलं नाही तुला. चल उठ आता अन हे म्हणत म्हणत रडत रडत शितल कोसळली.
आता तुम्ही सांगा चुक कशाची होती? इथे कोणाची नशिबाने थट्टा मांडली? अरूणची, शितलची, की त्या जन्माला येणार्‍या कोवळ्या कळीची ?



चुक नव्हती कोणाची,

तरीही नशिबाने थट्टा मांडली,

तहानलेल्या संसारासमोर,

सुखाची घागर क्षणात लवंडली...

-- सुर्यकिरण





वाचकांनो , माझी ही कथा काल्पनिक आहे. पण खरोखरचं हि वाचताना मी ही इतका भावूक झालो होतो की डायरीत पुन्हा लिहिताना मी ती अर्धवटच लिहिली. अन तसा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा चुक भुल माफ असावी. तुम्हाला आयुष्य नेहमी सुखाचे, समृद्धिचे अन सुखाचे जावो हिच प्रार्थना.
Sunday, April 11, 2010 | By: सुर्यकिरण

येवून जा...


कधी समजून घ्यायचं असेल प्रेम,
तर नजरेत माझ्या चमकून जा..

कधी बोलायचं असेल माझ्याशी,
तर स्वप्नांत माझ्या येवून जा..

कधी अनुभवायचा असेल स्पर्श माझा,
तर ओल्या धुंद ओठास माझ्या स्पर्शून जा..

कधी ऐकायचे असे संगीत मनातले,
तर तारा ह्रिदयाचा तू छेडून जा...

कधी छळेल एकांत तूला तेव्हा,
वाटेत मला नक्की भेटून जा...

कधी वाटेल भय जगण्याचे तूला,
तेव्हा थेट माझ्या मिठीस घट्ट बिलगून जा...



-- सुर्यकिरण..